Monday, September 29, 2014

भैरवी, पण निनावी

रात्रीचा दीड वाजलाय.
प्रचंड उकडतंय. डोक्यावरचा पंखा अर्धवटच फिरतोय.
पुस्तक वाचताना कळत नाही, पण लक्षात येतंय

सगळं आयुष्य निखळ समोर मांडणारे नसिरुद्दीन शहा.
काय काय साम्य आहे आपल्यात आणि त्यांच्यात.
आहे का मी उगाच शोधतोय..

संपलेला दिवस. केलेली कामे. आलेले फोन, न आलेले फोन.
हव्या असलेल्या गोष्टी, नको असलेल्या गोष्टी
सारखा ऑनलाईन रहायची सवय.
उगाच BBC किंवा Indian Express बघायचं.

काय झालंय पेक्षा काय राहिलंय याचाच हिशोब मोठा.
हेही नेमकं 'झालंय काय'…
काहीही डोक्यात आलं आणि लिहिलं (आणि कळालं नाही) म्हणजे कोणी गालिब होत नाही.
आणि इथे व्हायचं तरी कुणाला आहे?
संध्याकाळची शांत वेळ. हातात पुस्तक. डोळ्यावर झोप येतेय.
दारावरची बेल. दचकुन जाग.
अचानक आठवतं कि हे राहिलंय ते राहिलंय

शेंगदाण्याच्या टरफलासारखी प्रतिभा हवीये कुणाला?
कुणास ठाऊक कि आत आहे काय?
नुसतच टरफल?
हो कदाचित…

शांतपणे पडलोय.
मी Youtube उघडतो.
उस्ताद बिस्मिल्ला खान.
शेहनाई खूप आवडून पण आज तो सूर लागत नाही असंच वाटतंय.

हे विचार करायचं आपलं वय आहे का?
बरं तेवढी कुवत आहे का?
आणि कुणी सांगितलंय विचार करा. कोणी वाचणार आहे का?
आणि काय फरक पडणार कोणी वाचून?

कदाचित आयुष्यच भैरवी सारखं झालंय.
भव्यतेची ओढ आहे पण कातरपणाही तेवढाच.

न रहावून प्रभा ताईंचा 'शाम सुंदर नंद कुंवर' आठवतो
सवाईच्या शेवटी सवाई गंधर्वांची एक छोटी फिल्म दाखवतात
अंगावर आलेला शहारा आठवतो…

हरीजींची बासरी आणि मग भीमसेनजींची 'बाबुल मोरा'….

बहोत नैहर छूट गए ये भी तो बात सही है..